पुणे- "पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मोदी एका सभेत म्हणाले की, 'मैं घुस के मारूंगा'. मात्र, घुसून मारले सैन्याने, हवाईदलाने अन् याचे क्रेडिट कोणी घेतले? 'करुन गेलं गाव आणि भलत्याचं नाव', अशी सध्याची भाजपची अवस्था आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पुण्यातील उरुळी कांचन येथील सभेत ते बोलत होते.
हेही वाचा- शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर
निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. 'गुजरातचे एक 'मोठे' गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव आहे. निवडणूक शरद पवार या एका नावावरच ते लढवत आहेत. हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७० चा मुद्दा पुढे केला जात आहे.'
'गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाहीत. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला. आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेले काम नाही. मात्र, आज अवस्था काय आहे ? पिंपरी-चिंचवड येथे तरुणांना नोकऱ्यांवरुन काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती हाताळण्याची क्षमता यांच्यात नाही,' अशी जोरदार फटकेबाजी पवारांनी केली.