पुणे - एकेकाळी राज्य असणाऱ्या जम्मू-काश्मीरला मोठ्या कालखंडासाठी माहितीपासून दूर ठेवले गेले. तेथील इंटरनेट बंद करण्यात आले. हे उघड-उघड संविधानाच्या कलम 19 चे उल्लंघन होते. मात्र, याबाबत सरकारने स्पष्टीकरण देणे आवश्यक समजले नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार यांनी एन. राम यांनी व्यक्त केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 6 व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील टिळक स्मारकामध्ये स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन. राम बोलत होते.
एन. राम म्हणाले की, काश्मीरमधील नागरिकांना माहिती मिळवण्यापासून रोखण्यात आले आहे. मात्र, हा प्रश्न केवळ इंटरनेट पुरता मर्यादित नाही. त्याव्यतिरिक्त केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करून, तेथे केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.