पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरूद्ध एल्गार पुकारला आहे. यानंतर आता शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी धनकवडी भागात बांगलादेशी असल्याचे सांगत थेट शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत मनसे कार्यकर्त्यांसोबत पोलीसदेखील सहभागी होते.
शोध मोहिमेत यावेळी कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. या व्यक्तींनी ते बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे सगळेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शहरात मनसेची ही बांगलादेशी शोधमोहीम चांगलीच गाजत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत सहकारनगर पोलीसही हजर होते.
हेही वाचा - हिंदूंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजू नका, वारिस पठाणांना फडणविसांचा इशारा
जवळपास 50 मनसे कार्यकर्ते या भागात घरांमध्ये फिरून काही नागरिकांना कागदपत्रांची मागणी करत होते. यातील काही नागरिकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांच्या चौकशीनंतर सत्य परिस्थिती बाहेर येणार आहे. दरम्यान, जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मनसेने मागणी केली आहे.