पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांना सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी आहेत. ऑफलाइन परीक्षेची एकूण 114 केंद्र आहेत. ऑफलाईन केंद्राच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग आणि चेकींग करून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. मात्र, ऑफलाईन परीक्षेचा फॉर्म भरला असला तरी केंद्रावर आल्यावर ऑनलाइन परीक्षा देण्याची मुभाही विद्यापीठाने दिली आहे.
कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वाद सुरू होता. परीक्षा घ्यायच्या की नाही यावर मतमतांतरे होती. मात्र, प्रकरण न्यायलयात गेले आणि न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता या परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देता येणार आहेत. जे विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. तर, ऑफलाइनसोबत ऑनलाइन पर्याय असला तरी ऑनलाइन परीक्षेत मात्र थोडा गोंधळ पाहायला मिळाला आहे. कारण, ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ओटीपी वेळेत मिळाला नाही. त्यामुळे ओटीपी आल्यानंतर पुढील एक तास विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला. तसेच ऑफलाइन परीक्षासाठी महाविद्यालयांनी तयारी केल्याचे दिसून आले.
हेही वाचा - ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल विक्रीत वाढ; एका महिन्यात 15 लाख मोबाईलची विक्री