पुणे - विद्यार्थी पदवी घेतात, पीएचडी होतात मात्र, पुढे काय करायचे हे त्यांना समजत नाही. मात्र दिशा ठरवली तर, ते काहीही करू शकतात, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११६वा पदवीप्रदान समारंभ आज (8 जानेवारी) पार पडला. याप्रसंगी कोश्यारी बोलत होते.
समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि फरिदाबाद येथील 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कांग यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, "मी आज राज्यपाल आहे. मात्र, हायस्कूलमध्ये शिकत असताना माझ्या पायात चप्पलही नव्हती. त्यावेळी मी एक धोरण ठरवले; कुणाचे वाईट करायचे नाही आणि विद्वानांबरोबर राहायचे. त्यामुळे माझे शिक्षणही पूर्ण झाले आणि चांगली संधीदेखील मिळाली"
हेही वाचा - 'जेएनयू' हल्ल्याचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून निषेध
देशाच्या भल्यासाठी बुद्धी आणि क्षमतेचा वापर करण्याचे आवाहनदेखील राज्यापालांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले आहे. यावेळी पदवी ते पीएचडीपर्यंतची एकूण 1 लाख 9930 पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडी पदव्यांचा समावेश होता.