पुणे - एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जम्बो कोव्हिड केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर या कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रायकर यांच्या कुटुंबीयांनी केला. आता संभाजी ब्रिगेडनेही रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी भाष्य केले आहे. रायकर यांचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे झाल्याचा आरोप संभाजी ब्रिग्रेडने केला आहे.
बहुचर्चित जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. या रुग्णालयाबाहेर दोन दिवसाअगोदर एका व्यक्तीचा तडफडून उपचाराविना मृत्यू झाला होता. पुण्यात लोकांना रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, रूग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला खाजगी रुग्णालये सामान्य लोकांना लुटत आहेत. हा ठरवून केलेला सांघिक भ्रष्टाचार आहे.असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
महापालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे. महानगरपालिकेचे गोळ्या-औषधांसाठी किती 'टेंडर' निघाले याचा तपास झाला पाहिजे. या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातील महापालिकेच्या निष्क्रीय आरोग्य प्रमुखांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.