पुणे - जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून होणारे प्रस्थान आणि त्यानंतर त्या पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि मुक्काम हा आनंदी सोहळा दरवर्षी पुणेकर अनुभवत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांना हा आनंदी सोहळा अनुभवता नाही येणार. त्यामुळेच, पुण्यातील समर्थ युवा फाऊंडेशनच्या वतीने बालगंधर्व चाैकात तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरीचे पूजन करुन पालखी सोहळा आणि संतांच्या कार्याला प्रतिकात्मक अभिवादन केले.
पुणेकर आणि पालखी सोहळा याचे अद्वैत असून, पुणेकर भाविक दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनाचा पुण्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा आहे.
याच पंरपरेला स्मरुन 'संवाद पुणे' आणि 'समर्थ युवा फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामांचे वंशज संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. सदानंद मोरे आणि महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी डोक्यावर ठेऊन प्रातिनिधीक प्रदक्षिणा मारत दोन्ही ग्रंथांचे पूजन केले.
हेही वाचा : पुण्यातील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली