शिक्रापूर/पुणे - महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केले आहे. फक्त अत्यावश्यक वस्तू तसेच औषधांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकाने बंद आहेत. मद्यविक्री व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून मद्यविक्रीची घरपोच सेवा सुरू आहे. असे असले तरी शिक्रापूर करंदी येथे वेगवेगळ्या युक्त्या करून मद्याची विक्री केली जात आहे. शिरूर तालुक्यातील करंदी येथे किराणा मालाच्या दुकानात देशी-विदेशी दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात सरकारने अत्यावश्यक सेवेतीलच व्यवहार सुरू ठेवले आहेत. किराणा दुकाने या अत्यावश्यक सेवेत सुरू आहेत, परंतु करंदी गावात किराणा दुकानातून चक्क दारू विक्री सुरू असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी एक पथक तयार करून सापळा रचून या दुकानदारावर कारवाई करत तब्बल 135 देशी विदेशी दारू बॉटल ताब्यात घेतल्या आहेत. दुकानदार आरोपी संदीप खेडकर याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.