बारामती- करार शेतीचा कायदा २००६ साली विधानसभा व विधान परिषदेत काँग्रेसने मंजूर केला आहे. करार शेतीचा यशस्वी खेळ या देशाला व महाराष्ट्राला कोण दाखवत असेल तर तो खेळ बारामतीतून दाखवला जातो. असा घणाघाती आरोप माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर केला. खोत आज बारामतीत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, करार शेतीचा उगम हा बारामतीमध्ये आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनांमधून तुम्ही सांगता की, अमुक एका उसाचे वान, अमुक एका देशातून आणले, या झाडाला एवढी फळे लागतात. टॉमेटोचे रोप या देशातून आणले. हे आम्हाला बारामती ने शिकवलं. म्हणजे करार शेतीचा उगम हा बारामतीमध्येच आहे. मात्र आश्चर्य या गोष्टीचे वाटते बारामतीतून वाहणारी गंगा मुंबईत आल्यानंतर ती समुद्राला न मिळता गटाराला का मिळाली? करार शेतीचा कायदा तुम्ही केला आहे, त्याची अंमलबजावणी देखील बारामतीतून होते अशी टीका खोत यांनी पवारांचे नाव न घेता केली आहे.
पवार लबाड बोलत आहेत
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या लोक माझी सांगती या पुस्तकाचे उदाहरण देत खोत म्हणाले की, या पुस्तकात मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर सुद्धा शेतकऱ्यांना शेतमाल विकता आला पाहिजे. मी बारामतीचा भाजीपाला घेऊन मुंबईच्या मार्केट कमिटीत गेल्यानंतर आडत, हमाली, जागा भाडं, सेस, वाहतूक खर्च, कपात झाल्यानंतर मला वाटायला लागलं की, येथे आपली लूट होत आहे. हे पुस्तकात लिहिलेले बरोबर आहे. मात्र याच्याविरोधात ते आता बोलत आहेत. याचा अर्थ पवार साहेब आपला भाजीपाला घेऊन मुंबईला गेले नव्हते. म्हणजे ते लबाड बोलले आहेत असा टोलाही खोत यांनी यावेळी पवारांना लगावला.