पुणे - मोदी सरकारने आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा घाट घातला असल्याचा आरोप राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला. तसेच देशावासीयांमध्ये धार्मिक फूट पाडणारा हा कायदा राजस्थान सरकार लागू करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही धर्माचा असला तरी तो भारत मातेचा पुत्र आहे. फक्त एका विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा आहे. म्हणून त्याला नागरिकत्व नाकारणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे पायलट म्हणाले. तसेच १३० कोटी भारतीय हिंदू असल्याच्या मोहन भागवतांच्या विधानावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.
देशात आर्थिक मंदी आहे. मात्र, त्यासाठी सरकार काम करीत नाही. याउलट एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरत आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल विविध वक्तव्ये केली जात आहे. केंद्र सरकारने देशात सध्या एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.
देशात महागाई, बेरोजगारी वाढली. मात्र, मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे. मात्र, भारतातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करायला लावणे हे योग्य नाही. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असताना बाहेरच्या लोकांची चिंता करण्याचे कारण काय? असे पायलट म्हणाले.