पुणे - माजी मंत्री बबनराव लोणीकर आपल्या भाषणात एका महिला तहसीलदाराबद्दल तहसीलदार बाई 'हिरोईन' आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थनही केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी 'तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही', अशा जोरदार शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच इथून पुढे त्यांनी गांभीर्याने बोलावं, अशा सल्लाही दिला.
बबनराव! आम्ही हिरोईन आहोतच, पण विचाराने, जिजाऊ-सावित्रीच्या आम्ही लेकी आहोत. तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर, त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही. तहसीलदार म्हणून ज्या आमच्या हिरोईन आहेत, त्याच तुम्हाला पुष्कळ आहेत. त्यामुळे लोणीकरांनी यापुढे बोलताना विचार करून बोलावे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले...
सत्तेत असताना तुम्हाला सत्तेची मस्ती होती. पण, आता सत्ता गेल्यावर तरी जमिनीवर या, अशा व्यक्तींना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - 'हिरोईन म्हणजे नायिका'; माजी मंत्री लोणीकरांकडून स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन