पुणे- परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, भिमाशंकर परिसरासह सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जुन्नर,आंबेगाव,खेड तालुक्यातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हा परिसर मोठ्या प्रमाणात आदिवासीबहूल असल्यानं आता जगायचं कसं असा प्रश्न येथील आदिवासी लोकांना पडला आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात मोठ्याप्रमाणात आदिवासी समाजाचं वास्तव्य आहे. येथे पाण्याचे स्त्रोत पुरेशाप्रमाणात उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या भातशेतीवरच येथील शेतकरी अवलंबून असतात. मात्र यावर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. यंदा भात लागवड काळात पुरेसा पाऊस झाला. मात्र नंतर पाऊसाने दांडी मारली याचा फटका पिकाला बसला. तसचं आता भात काढणीच्यावेळी सतत पाऊस सुरू असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
कोरोना महामारीच्या काळात येथील अदिवासी समाजाला दुसरं कोणतं कामही मिळत नाही. त्यामुळे त्यांची उपजीविका ही केवळ भात शेतीवरच अवलंबून आहे. असं असताना पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं आता जगायचं कसं असा प्रश्न येथील आदिवासी समाजाला पडलाय.