भीमाशंकर(पुणे)- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे षष्ठी ते नवमी असा सात दिवसांचा महारुद्र सुहाकार सोहळा केला जात असतो. या सोहळ्यात हवन, कीर्तन प्रवचन जागर अन्नदान केले जाते. मात्र यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महारुद्र सुहाकार सोहळ्यावर निर्बंध आले आहेत.
पन्नास वर्षांपासून चालत आलेली परंपरा खंडीत पडू नये, यासाठी पुजारी व गुरव या मर्यादित लोकांच्या उपस्थितीत दिवसरात्र प्रत्येक दोन तासांनी शिवलिंगावर महारुद्र सुहाकार पठण साधेपणाने सुरू आहे. मात्र या सोहळ्याला भक्तांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून भाविकांना श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रवेशास निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला महारुद्र सुहाकार सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक सहभागी होत असतात. या सोहळ्यादरम्यान प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यंदाही या सोहळ्यावर कोरोना महामारीचे संकट असल्याने मर्यादित पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडत आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन अतिशय कडकपणे लागू करण्यात आला आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. भीमाशंकर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ कोरोनामुळे सध्या भाविक आणि पर्यटकांशिवाय ओस पडले आहे.