पुणे - 'माझा कारभारी, लय भारी', असे म्हणत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या पाळू गावात एका शेतकरी कुटुंबातील महिलेने आपल्या पतीला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याने खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली. या महिलेचे देशभरात कौतुक करण्यात आले. या महिलेचीआता केंद्र सरकारच्या डाक विभागाने देखील दखल घेतली आहे. या 'कारभारणी'च्या फोटोचे पोस्ट तिकीट तयार करून या महिलेचा सन्मान करण्यात आला आहे.
खेड तालुक्याच्या पाळू गावातील संतोष गुरव व रेणुका गुरव यांचा दोन मुलांसह संसार सुरू आहे. गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. त्यात संतोष गुरव उमेदवार म्हणून उभे राहिले. गावाला गावपन देण्यासाठी गावकी-भावकीच्या या निवडणुकीत भरघोस मतांनी संतोष गुरव यांचा विजय झाला. विजयाचा आनंद उराशी कवटाळून रेणुका गुरव यांनी आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावात फेरी मारली. माझा कारभारी आता गावाच्या विकासाला हातभार लावील, असे आश्वासन गावाला दिले. त्यांच्या या मिरवणुकीचे देशभरात कौतुक झाले. आता केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून त्यांच्या फोटोचे पोस्ट तिकीट देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान फक्त गुरव कुटुंबाचा नसून संपूर्ण गावाचा असल्याची भावना रेणुका गुरव यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील बहुतांशी महिला आजही चूल आणि मूल हीच संकल्पना घेऊन आपले आयुष्य जगत असतात. मात्र, कुटुंबाच्या यशस्वी वाटचालीमध्ये, प्रत्येक सुखदुःखात महिलेचा मोलाचा वाटा असतो. मात्र, अनेक महिला आजही पुढे येऊन आपल्या भावना मांडत नाहीत. पुढील काळात प्रत्येक महिलेने पुढे येऊन पतीच्या खांद्याला खांदा लावून सर्व गोष्टींमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रेणुका गुरव यांनी महिलांना केले आहे.
रेणुकाचा सन्मान गावाला समर्पित -
पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आनंद झाला. माझी कारभारीण रेणुकाने, मला खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली. तिचे सर्वांनी कौतुक केले. तिचे ऋण कसे फेडणार या विवंचनेत असतानाच केंद्र सरकारच्या डाग विभागाकडून तिच्या कार्याचा सन्मान झाला. ही मोलाची बाब असून रेणुकाचा सन्मान हा गावासाठी समर्पित करत असल्याचे संतोष गुरव यांनी सांगितले.