पुणे : पुणे-सातारा महामार्गाच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला बडतर्फीची नोटीस बजावली आहे. लवकरच कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे सातारा रस्त्यावरील टोल नाका हटवण्यात यावा, या मागणीसाठी काम करणाऱ्या खेडशिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने याबाबतची माहिती समोर आणली आहे.
समितीच्या तक्रारी नुसार, 2010 मध्ये पुणे-सातारा या सहापदरी रस्त्याचे काम चालू करण्यात आले. हे काम 2013 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रिलायन्स इन्फ्रा कंपनीने अनेक वेळा मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे पुणे सातारा हा मार्ग धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे खेडशिवापूर टोल हटाव अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत होती. यासाठी समिती ही स्थापन करण्यात आली.
समितीने अनेक वेळा टोलवरील वसुली थांबवावी याकरीता पाठपुरावा आणि अनेक आंदोलनेही करण्यात आले होते. आता सबंधीत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याने खेड शिवापूरचा टोल नाका बंद करण्याची मागणी जोर धरत असून, टोलनाका हटाव कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे.