पुणे : संतोष दत्तात्रय सुरवसे पुण्यातील कर्वेनगर भागातील आनंद मेन्स पार्लरचे संचालक आहे. त्याने 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मोफत हेअर कटिंगला सुरवात केली होती. तब्बल साडे अठरा तास म्हणजेच रात्री साडे तीन वाजेपर्यंत 540 जणांचे हेअर कटिंग करून एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, लिम्का बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड घेणार आहेत. याबाबतची सर्व प्रक्रिया त्याने पूर्ण केली आहे.
जगात एक रेकॉर्ड : आपण पाहिले तर या अगोदर सलून क्षेत्रात भारतात जावेद हबीब यांनी एक रेकॉर्ड बनविला आहे. त्यांनी तब्बल 24 तासात 411 हेअर कटिंग करून रेकॉर्ड बनविला होता. तसेच जगात युकेमधील नाभी सलोनी याने देखील जगात एक रेकॉर्ड बनविला होता. त्याने 24 तासात 527 हेअर कटिंग करून रेकॉर्ड केला होता. आता संतोषने या दोघांचेही रेकॉर्ड मोडले. साडे अठरा तासात 540 हेअर कटिंग करून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
540 जणांची फ्री हेअर कटिंग : संतोषने केलेल्या रेकॉर्डमध्ये 540 जणांचे हेअर कटिंग मोफत केले आहे. विशेष म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीची कटिंग हवी आहे, त्यानुसार त्याने ती करून दिली आहे. त्याचे हे दुकान महाविद्यालय परिसरात आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती. सकाळी 9 वाजता सुरू झालेली कात्री हे थेट दुसऱ्या दिवशी रात्री साडे तीन वाजताच थांबली. पाहता पाहता 540 जणांनी हेअर कटिंग करून संतोषने नवीन रेकॉर्ड केला आहे.
म्हणून केला वर्ल्ड रेकॉर्ड : मी मुळात नाव्ही आहे. आमच्या क्षेत्रात म्हणजेच केस कटिंग करणाऱ्याला खूप कमी लेखले जाते. हीच बाब माझ्या डोक्यात होती. आमच्या क्षेत्राला देखील वरती घेऊन जाण्यासाठी मी हे रेकॉर्ड करत आहे. आज आपण पाहिले तर महिलांना ब्युटीशन म्हणून पाहिले जाते, पण आमच्या पुरुष मंडळींना नाव्ही म्हणूनच पाहिले जाते. म्हणून कुठेतरी आम्हाला देखील आदराचे स्थान मिळावे म्हणून मी आज हे रेकॉर्ड करत आहे. याबाबत मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, लिम्का बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड येथे माहिती देखील दिली आहे. त्याबाबत त्यांच्या सूचना आल्या आहेत, असे संतोष दत्तात्रय सुरवसे याने ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले.