पुणे - मनसेचे एकमेव शिलेदार असलेले किल्ले शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. यासाठी खेड आंबेगाव जुन्नर या परिसरातून आमदार सोनवणे यांचे समर्थक मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. मात्र, मनसेचा एकही कार्यकर्ता आमदार सोनवणे यांच्या बरोबर शिवसेनेत जात नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष समीर थिगळे व सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांनी एकत्र येत दिली.
मनसेची संघटनात्मक बांधणी होत नसल्याचे कारण देत आमदार सोनवणे हे शिवसेनेच्या गळाला लागले. मात्र, मनसेची संघटनात्मक बांधणी किती पक्की आहे, याचे हे एक उत्तम उदाहरण. मनसेच्या एकमेव आमदारांसोबत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतून एकही मनसेचा पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार नसून, आम्ही राज ठाकरे यांचे मनसैनिक आहोत. या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा आमचा पिंड नाही असेही कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.