पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी 'फकीर' माणूस आहे. राहुल गांधी यांना जर पुढे यायचे असेल, तर त्यांनीही 'फकीर' व्हावे, असा सल्ला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राहुल यांना दिला आहे. पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आठवले पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राफेल घोटाळा नाकारत राहुल गांधींना सल्ला दिला.
यंदाच्या लोकसभा निवडणूतीत आम्हाला भरघोस मते मिळतील. या निवडणूकीत भाजपला २८२ हून अधिक जागा तर एनडीएला ३६० जागा मिळतील, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. या निवडणूकीत काँग्रेसची अवस्था खराब असल्याचेही आठवले म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतील, पण त्याचा काही परिणाम युतीवर होणार नाही. राहुल गांधी हे राफेलमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, या प्रकारणात काहीही घोटाळा झालेला नाही. राहुल गांधींना स्वप्नातही राफेल दिसते, मोदी हे स्वच्छ आहेत. ते भ्रष्टाचारी नाहीत. फकीर माणूस आहेत. राहुल गांधींना जर पुढे जायचेच असेल तर त्यांनी फकीर व्हावे, खरे तर त्यांना लग्न करणे गरजेचे असल्याचेही आठवले म्हणाले.
वंचित नाही, किंचित आघाडी -
राज्यात तयार झालेली वंचित आघाडी ही किंचित आघाडी आहे. राज्यात त्यांची ताकद किंचित आहे, त्यांचा परिणाम फार काही होणार नाही. उलट त्यांच्यामुळे मत विभागणी होऊन भाजप सेनेला फायदाच होईल. असे भाकित आठवले यांनी वर्तवले. प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यायला हवे होते. त्यांना मंत्रिपद मिळाले असते, असेही आठवले म्हणाले.
काही दिवासांपूर्वी एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या शिवसेना भाजपमध्ये युती झाली. मात्र, प्रकाश आंबेडकर आणि आमचा वाद का मिटत नाही? असा सवाल आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला आहे.