पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये 125-125 असे जागा वाटप झाले आहे. मित्रपक्षांना केवळ 38 जागा दिल्या आहेत. मात्र, मित्रपक्षांना ही जागा वाटप अमान्य आहे. मित्रपक्षांसाठी 55 ते 60 जागा द्याव्यात, आम्ही त्या आपापसात वाटून घेऊ, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रजा लोकशाही परिषदेचा मेळावा पार पडला. मेळावा संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. या मेळाव्यात राज्यातील 10 ते 15 संघटनांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आली.
हेही वाचा - 'सेना-भाजप जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरलाय'
मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोललो आहे. त्यामुळे भाजप-सेनेविरोधात लढायचे असेल, तर आम्हाला कुणीही गृहीत धरू नये. मित्रपक्षांची ताकद लक्षात घेता 55 ते 60 जागा सोडल्याच पाहिजेत, असे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टींनी केलेली वाढीव जागांची मागणी पाहता आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.