पुणे- राम मंदिर आणि बाबरी मज्जिद या संदर्भात उच्च न्यायालयाचा येत्या काही दिवसात निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजगुरुनगर पोलिसांकडून हिंदू-मुस्लीम व सर्व जातीय प्रमुखांची पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. निकालामुळे विविध धर्मातील लोकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जात, धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हा एक मोठा धर्म आहे, असे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले. या माध्यमातून हिंदू-मुस्लीम समाजात एकी आणण्याचे काम आज राजगुरुनगर पोलिसांकडून करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात राम मंदिर बाबरी मस्जिद संदर्भात चर्चा करण्यात आली. दोन्ही धर्मातील लोकांकडून या उपक्रमावर चांगला प्रतिसाद मिळाला. राम मंदिर बाबरी मज्जिद यासंदर्भात कुठलाही निर्णय लागला तरी आम्ही तो स्वीकारू, असा विश्वास दोन्ही धर्मातील लोकांकडून देण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाचे व हिंदू धर्माचे मुख्य नेतृत्व करणाऱ्यांकडून बैठकीत चांगला प्रतिसाद मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा- 'दोन तासात तिढा सुटेल, गडकरींना मध्यस्थीसाठी बोलवा'