दौंड(पुणे) - रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे कुल यांनी ही मागणी केली. यावेळी दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, सचिव विकास देशपांडे, अयुब तांबोळी उपस्थित होते.
रेल्वे सेवा बंद असल्याने कामासाठी दौंड-पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे, रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचारी, शासकीय, निमशासकीय सेवेतील इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनादेखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी द्यावी. अशी मागणी कुल यांनी केली. सोबतच कोरोना उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली.
रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी कामानिमित्त दुचाकीवरून दौंड -पुणे प्रवास करत कर्तव्य बजावत आहेत. पावसाळ्यात त्यांचे हाल होण्याची शक्यता तसेच संभाव्य धोका नाकारता येत नाही. त्यामुळे, या कर्मचारी बांधवासाठी एक स्वतंत्र बोगी जोडण्याची मागणी आमदार कुल यांनी केली. याबाबत सोलापूर विभागीय आयुक्त सकारात्मक आहेत, तेव्हा पुणे रेल्वे विभागीय आयुक्तांशी याबाबत चर्चा करण्याचे व मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. सोबतच दौंड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक उपाययोजना आणि जनजागृतीबाबतही यावेळी चर्चा झाली .