पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया आणि रमजान ईद या सणांचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील विविध दवाखान्यात तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व पत्नी सुजाता पवार व रावलक्ष्मी ट्रस्टच्यावतीने पुरणपोळी अन शिरखुर्मा, अशी गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली.
रुग्णांना पुरणपोळीचे जेवण व शीरखुर्माचीही मेजवानी -
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती, अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे पवित्र सण एकत्र आल्याने यानिमित्त शिरूर व हवेली तालुक्यातील बोरा महाविद्यालय, शिरूर, मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी-चौफुला, कोंढापुरी, शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे ग्रामीण रुग्णालय, मलठण, पाबळ, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, वाघोली, कारेगाव येथील सर्व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा सण गोड व्हावा, या दृष्टिकोनातून या सर्व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळीचे जेवण व शीरखुर्माचीही मेजवानी देण्यात आली. तालुक्यातील अनेक भागांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक रुग्ण विविध खासगी तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. यासाठी शिरूर तालुक्यात विविध भागात विलागिकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या रुग्णांना आपलेपणाची भावना निर्माण होण्यासाठी तसेच लवकर बरे होण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात असून विशेषतः आहाराकडे लक्ष दिले जात आहे. सर्व रुग्णांचा सण गोड व्हावा, यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी स्वतः लक्ष देऊन संपूर्ण नियोजन केले. मांडवगण फराटा येथील केंद्रात त्यांनी स्वतः सर्व जेवणाची तयार करत कोरोना रुग्णांसमवेत भोजन करत पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
हेही वाचा - कोरोना महामारीत विविध ठिकाणी साधेपणाने अक्षयतृतीया साजरी, वाचा सविस्तर