पिंपरी-चिंचवड (पुणे) - हिंजवडीच्या हद्दीत क्रिकेट खेळणाऱ्या 13 मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून नवले अकॅडमी येथे क्रिकेट खेळत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्लू रिज सोसायटी येथील बाजूस असलेल्या नवले क्रिकेट ॲकॅडमी या ठिकाणी अल्पवयीन मुले क्रिकेट खेळत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना मिळाली. त्यांनी कर्मचारी अधिकारी यांना संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. नवले क्रिकेट अकॅडमी येथे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, कर्मचारी वाझे आणि तीन कमांडो त्या ठिकाणी पोहोचले. अकॅडमीमध्ये काही मुले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाले. क्रिकेट खेळण्याऱ्या मुलांच्या तोंडाला मास्क नव्हता. क्रिकेट खेळणाऱ्या तेरा मुलांना हिंजवडी पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोविड परिस्थितीमध्ये अशाप्रकारे एकत्र जमून क्रिकेट खेळणे कोविड प्रादुर्भाव वाढण्यास घातक करू शकते, अशी समज देण्यात आली.