पुणे - खेड शिवापूर टोलनाक्यावरील सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर यापुढे पुणे जिल्ह्यातील वाहनांना टोल माफ असणार आहे.
टोलनाका सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हा टोलनाका पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर हटवण्यासाठी आज सकाळपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी हा टोलनाका ताबडतोब बंद करण्यात यावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, आंदोलक आणि राष्ट्रीय महामार्ग पदाधिकारी यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेतून पुढील 8 दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, पुरंदर या भागातील गाड्या मोफत सोडण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या 8 दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या टोलनाक्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी असते. तासंतास येथील वाहतूक कोंडी सुटत नाही. त्यामुळे हा टोलनाक्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत आहे. तर काम अपूर्ण असल्यामुळे 1 जानेवारी 2014 पासून टोलवसुली बंद व्हायला हवी होती. मात्र, ती सुरू ठेवून गेल्या 9 वर्षांत जनतेकडून ठेकेदाराने कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याला 6 पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 उजाडल्यानंतरही हे काम प्रलंबित आहे त्यामुळे हा टोलनाका बंद करण्यात यावा, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे.