पुणे - मुंबईनंतर आता पुण्यातीलही निर्बंध शिथिल होणार आहेत. उद्यापासून सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसेच हॉटेलही आठवडाभर रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले शहरातील मॉल देखील रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, ज्या लोकांचे दोन डोस झाले आहेत, अशांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा पॉझिटिव्ही रेट 5 टक्क्यांच्या पुढे असल्याने ग्रामीण भागातील दुकानेही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊनही लागू असणार नाही. त्यामुळे आठवडाभर हे नवीन नियम लागू असणार आहेत.
...तर पुन्हा निर्बंध
'पुणे शहरातील पॉझिटिव्ही रेट साडेतीन टक्के आहे. पिंपरी - चिंचवड शहराचा पॉझिटिव्ही रेट 3.03 टक्के आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरवासीयांसाठी उद्यापासून सूट देण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही शहरातील पॉझिटिव्ही रेट 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास आज घेतलेला निर्णय लगेच थांबविण्यात येईल आणि नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे', असंही यावेळी पवार यांनी सांगितलं.
दुकान मालक-कामगारांना मास्क सक्ती
'शहरात दुकानामध्ये विक्री करत असताना त्या दुकानातील मालक आणि सेल्समन हे मास्क वापरत नाहीत. कोरोनाचा गांभीर्याने विचार करत दुकानदार तसेच त्याठिकाणी काम करत असलेल्या कर्मचारी यांनी देखील मास्कचा वापर कंपल्सरी केला पाहिजे', असही अजित पवार यांनी सांगितलं.
खेळांनाही परवानगी
'जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोर क्रीडा प्रकार हे देखील सुरु राहणार आहेत', असंही अजित पवार यांनी सांगितलं.
महापौरांचे ट्विट
'पुणे अनलॉक ! निर्बंधांमध्ये शिथिलता, आपल्या पाठपुराव्याला यश !', असं ट्विट पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. मात्र, अजित पवारांनीही त्यांना निर्णय देतानाच उत्तर दिल्याचे दिसत आहे.
'कोणाच्याही दबावापोटी पुणे अनलॉक नाही'
'पुणे अनलॉक करण्यात येत आहे. पण मी कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. तर या दोन्ही शहरातील पॉझिटिव्ही रेट साडेतीन टक्केच्या आत आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे', असेही अजित पवार म्हणाले.
ग्रामीण भागातील 13 तालुक्यांमध्ये लेव्हल 3
'ग्रामीण भागातील पॉझिटिव्ही रेट अजूनही कमी झालेला नाही. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ही रेट हा 5 टक्क्यांच्या पुढे असल्याने तेथे आहे तेच निर्बंध लागू असणार आहेत. मात्र ज्या भागात पॉझिटिव्ही रेट कमी झाला आहे, अशा ग्रामीण भागातील 13 तालुक्यांमध्ये लेव्हल 3 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील दुकाने आणि हॉटेल्स दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत', असे पवार यांनी म्हटले.
हेही वाचा - कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र डोस प्रभावी; ICMR च्या अभ्यासाचा निष्कर्ष