पुणे - शहरामध्ये विधानसभेच्या आठही जागा भाजपकडे गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये निराशेची भावना पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिक आता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदारकीची एकही जागा लढायची नसेल तर शहरात पक्ष कसा प्रस्थापित होईल? असा प्रश्न विचारत पुण्यातील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांनी मंगळवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.
हेही वाचा - जुन्नरमधून सेनेच्या शरद सोनवणेंचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवाजी आढळरावांची उपस्थिती
मात्र, भाजपने मंगळवारी आपली पहिली यादी जाहीर केली आणि या यादीत पुण्यातील आठही मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेल्या दोन जागा सुद्धा त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. त्यामुळे शिवसैनिक आता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायला हवा होता. मात्र, आता भाजप उमेदवार घोषित केल्याने शिवसेना ही माघार घेणार नाही, असे सांगत अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असे धनवडे यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - आमदाराने सभासदाला 'माकड' म्हटल्याचे संपूर्ण शिरूर तालुक्यात पडसाद
विशाल धनवडेंनी प्रचार देखील सुरू केला असून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे पुण्यात कसबा तसेच इतर मतदारसंघात देखील शिवसेनेच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार का? हा खरा प्रश्न आहे.