पुणे - कोरोना महामारीच्या संकटामुळे कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणारा शौर्यदिन मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक व पारंपरिक नियोजनातून साजरा होणार आहे. स्थानिक व बाहेरील मर्यादित लोकांना प्रशासनाकडून पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कायदा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे बदल करून पुणे-नगर मार्ग, चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
पुणे-नगर वाहतूक आजपासून बंद करण्यात येणार आहे. त्यात पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे असतील
- अहमदनगरकडून येणारी वाहतूक बेलवंडी फाट्यावरून दौंड मार्गे जाईल
- शिरूर व्हावरा फाटा मार्गे सोलापूर हायवेवरून चौफुला मार्गाने जाईल
- मुंबई - पुणे पिंपरी चिंचवड व एमआयडीसी एरिया, चाकण एमआयडीसी मधून होणारी व नगर औरंगाबाद जाणारी वाहतूक चाकण खेड मार्गे होईल
परिसरात संचारबंदी लागू -
कोरेगाव भीमा परिसरातील 18 गावात 144 कलम लावण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशानुसार पाच जणांना पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही व कोरेगाव भीमा परिसरातील 18 गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्स लावता येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं.
पोलीस बंदोबस्त असणार
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभावर शेवरे दिन मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. या परिसरातील वाहतूक सेवाही बंद ठेवत संचारबंदीचे आदेश लागू करण्यता आले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षाच्या तुलनेत पोलीस बंदोबस्त 50 टक्क्यांपेक्षाही कमी ठेवण्यात आला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
तात्काळ आरोग्य तपासणी
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत शौर्यदिन साजरा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी होणार असून त्यांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात येणार आहे. यामध्ये काही लक्षण आढळून आल्यास तात्काळ अँटीजन टेस्ट करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.