पुणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहत क्षेत्रात अडकलेले अनेक कामगार मूळगावी जाण्यासाठी आपल्या कुटुंबासह पायी प्रवास करत रस्त्याला लागले आहेत.
रांजणगाव, सणसवाडी शिक्रापूर या औद्योगिक क्षेत्र परिसरात अनेक राज्य परराज्यातील कामगार आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास होते. मात्र, कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले, यामध्ये औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद ठेवण्यात आल्याने या कामगारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पोटाच्या अन्नासाठी त्यांना फिरावे लागत आहे. त्यामुळे हे कामगार आता आपल्या गावाकडे निघाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन दिवस-रात्र मेहनत घेत असून सर्व नागरिकांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कामगारांची अन्नपाण्याची व्यवस्था स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि प्रशासनाने केलेली असतानाही हे कामगार का परतीच्या मार्गाने चालले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.