पुणे : गौतमी पाटील चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती. महिला आयोगाने देखील याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली : 24 फेब्रुवारीला एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना अर्धनग्न व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ समाज माध्यमांवर या विकृत मंडळींनी व्हायरल केला. इतकेच नाही तर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलसोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
हावभावावरून गौतमी आधीच वादात अडकली होती : आपल्या अदाकारी आणि नृत्यामुळे गौतमी पाटील ही राज्यभरात अल्पवधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र वाद गौतमीचा पिच्छा काही केल्या सोडत नाहीत. आपल्या नृत्याच्या हावभावावरून गौतमी आधीच वादात अडकली होती. त्यानंतर तिने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला होता. दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मिळणार प्रतिसाद हा उदंड होता. तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजीच्या बातम्या या येतच असतात.
अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले : अशात काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना गौतमी पाटीलसोबत घडली होती. तिचे कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. मनोवृत्ती विकृत असणाऱ्या व्यक्तीकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात असतानाच गौतमी पाटील पार कोलमडून गेली होती. मात्र, तिची आई आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी तिला सावरले. पुणे सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी आता एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा : Sharad Pawar Resigns : शरद पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहोत-अनिल पाटील