पुणे - युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सूत्रधार महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. दीपक मारटकर यांची बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केली होती. पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली आहे.
जेवण झाल्यानंतर दीपक मारटकर हे एका मित्रासह घराबाहेर बसले होते. याचवेळी तीन मोटारसायकलवरून आलेल्या सहा जणांनी त्यांच्यावर कोयत्याने तब्बल 48 वार केले आणि पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना जवळच असलेल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दीपक मारटकर उभे होते. तर त्यांच्याविरोधात संशयित आरोपी अश्विनी कांबळे याही उभ्या होत्या. या निवडणुकीत या दोघांचाही पराभव झाला, तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. याच राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत सनी कोलते आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे उघड झाले आहे. सनी कोलते हा अश्विनी कांबळे यांचा मित्र आहे. सुपारी देऊन हा खून करण्यात आला. पोलिसांना संशयित आरोपींची नावे समजली असून तिघांना ताब्यात घेतले आहे तर, इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.