पुणे - पुण्यातील रविवार पेठेत सराफा व्यापाऱ्याच्या वाहनाच्या बोनेटवर ऑईल सांडल्याचा बनाव करून, त्याच्या गाडीतील 55 लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरांना फरासखाना पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. चोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले.
शंकर लक्ष्मण आचारी उर्फ शेट्टी (वय ३५, रा. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक), यादगीर लक्ष्मण आचारी आणि मेरी व्यंकटेश नायडू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार व मुख्य सुत्रधार व्यंकटेश नायडू, शांता लक्ष्मण आचारी व लक्ष्मण आचारी यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींनी कोथरूड परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने 7 लाखांची चोरी केल्याचे समोर आले आहे.
चोरांचा शोध घेण्यासाठी तपासले तब्बल 700 सीसीटीव्ही कॅमेरे
करण माळी (वय ३५, रा. देहुरोड) हे सराफा व्यापारी रविवार पेठेतून दागिने खरेदी करून 31 डिसेंबरला आपल्या घरी जात होते. ते आरसीएम कॉलेजसमोर आले असता, त्यांच्या गाडीवर ऑईल टाकण्यात आले, दरम्यान त्याच्या गाडीच्या बोनेटमधून ऑईल सांडत असल्याचा बनाव करून त्यांना एकाने बाहेर बोलावले, तर दुसऱ्याने संधीचा फायदा घेऊन त्यांच्या गाडीतील 55 लाख 62 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण व आकाश वाल्मीकी यांना एका दुचाकीवरुन संशयित जाताना दिसला. त्या तिघांचा घटनास्थळापासून थेट सासवडपर्यंत सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे तपास करण्यात आला. तपासात हे आरोपी कर्नाटकमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. या धाग्यावरुन पोलिसांनी कर्नाटकात जाऊन शंकर आचारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार श्रीनिवास लक्ष्मण आचारी, यादगीर आचारी, हरीष शेट्टी यांच्यासोबत चोरी केल्याची माहिती दिली.
मुख्य आरोपी अजूनही फरार
कर्नाटक राज्यातील या टोळीने महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन नागरिकांची दिशाभूल करून, त्यांची नजर चुकवून, चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. हे चोरटे विविध शहरात जाऊन तेथे काही दिवस भाड्याने घर घेऊन चोरी करुन नंतर दुसरीकडे जात होते. फरासखाना पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेऊन या टोळीतील ३ आरोपींना पकडले आहे. या टोळीतील मुख्य आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्याचा तपास करत आहे. अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दिली.