पुणे - पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या 6 पबवर छापे टाकून कारवाई केली. या पबमधून रात्री बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन पबमधून साडेचार लाख रुपये किमतीच्या 196 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्ले बॉय हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत सुरू होते, तर अनेक तरुण-तरुणी डान्स करताना आढळल्या. याठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या 147 दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
येरवड्यातील लॉर्ड्स ऑफ ड्रिंक्स या पबवरही पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई केली. येथून एक लाख रुपये किमतीच्या 49 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय बंडगार्डन परिसरातील नियमभंग करणाऱ्या मिलर पब, केनो पब, बोटॅनिक पब, या पबवर कारवाई करण्यात आली.