पुणे - शहरातील मध्यवर्ती भागात प्रवाशांना आता दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर केला. दरम्यान, या प्रकल्पासाठी पन्नास बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.
शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मीटरमध्ये कमी रुंदीचे रस्ते आहेत. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, त्याचबरोबर नागरिकांना स्वस्तात पीएमपीने प्रवास करता यावा, यासाठी दहा रुपयामध्ये दिवसभर प्रवास करता येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार -
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात शहराचे मध्यभागात दिवसभर दहा रुपयांत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा हेमंत रासने यांनी केली होती. मात्र, कोरोनामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन महिन्यात दहा रुपयांत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या उपक्रमामुळे शहराच्या मध्यभागातील वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि जास्तीत जास्त प्रवासी बसचा वापर करतील, अशी अपेक्षाही रासने यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - भोर पोलीस कोठडीतून दोन आरोपींचे पलायन; खिडकीचे गज कापून पोबारा
40 बसेससाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च -
शहरातील पुणे स्टेशन, स्वारगेट त्याचबरोबर सर्व पॅटर्नच्या भागामध्ये नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. महापालिका 26 लाख 95 हजार रुपयांना एक बस खरेदी करणार आहे. एकूण 50 बसेससाठी 13 कोटी 47 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने योजना मांडण्यात आली होती. भविष्याचा विचार करून शहराच्या अन्य भागातसुद्धा ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.