पुणे- इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची पी.एच.प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनी लाँकडाऊनच्या काळात शेतक-यांसह नागरिकांच्या हितासाठी पुढे सरसावली आहे. वाहतुक ठप्प झाल्याने शेतमाल पडून आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाल्यांचा तुटवडा जाणवत आहे. ही अडचण लक्षात घेवून कंपनीव्दारे इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जवळच्या परिसरातील १५ शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला खरेदी करुन पुणे शहराच्या ५२ सोसायट्यांमधील १ हजार कुटुंबांना भाजीपाला पोहोच केला जात आहे.
देशावर कोरोनाच्या संकटाचे सावट पसरल्याने वाहतुक व बाजारपेठा ठप्प आहेत. यामुळे शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला कुठे व कसा विकायचा असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला असतानाच पुणे जिल्हयातील इंदापूर येथील शेतकऱ्यांच्या पी. एच. प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनी पुढे आली त्यांनी थेट शेतक-यांकडून भाजीपाला विकत घेत पुणेकरांना घरपोच वितरित करण्याची सोय केली आहे.
वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने व मालाला उठाव नसल्याचे सांगत व्यापारी वर्ग शेतकऱ्यांचा भाजीपाला सध्या खरेदी करत नाहीत. त्यामुळे काढणीला आलेला भाजीपाला वेळेत काढला जाऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे त्यातच दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन देखील वाढत आहे. स्थानिक बाजारात सर्व मालाची विक्री होत नसल्याने नुकसान होत होते. शेतातच भाजीपाला सडून जाऊ लागला होता. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पी एच प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली आहे.
दर्जेदार भाजीपाला योग्य पॅकिंग यामुळे पुणेकर ग्राहक देखील या खरेदीला पसंती देत आहेत. इंदापूर तालुक्यातील रामवाडी येथे असणा-या पी. एच. प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्यूसर कंपनीत शेतकरी आपला शेतमाल विकतात. नागरिकांना रोज लागणारा भाजीपाला शेतकऱ्यांकडून घेतला जातो.
शेतक-यांकडून घेतलेल्या भाजीपाल्याची पूर्णपणे योग्य ती खबरदारी, काळजी या कंपनीच्या सदस्याकडून घेतली जाते. मालाची वर्गवारी व वजन करुन एका बॉक्समध्ये कांदा, बटाटे, मिरची, गवार ,टोमॅटो ,वांगी, भेंडी, भरीताची वांगी, लिंबू बीट, कोथिंबीर, शेवगाच्याा शेंगा, लसुन आद्रक अशा प्रकारचा भाजीपाला जो शहरी भागातील कुटुंबाला एक आठवडा पुरेल या पद्धतीने हा बॉक्स तयार केला जातो.
ज्या ग्राहकांना भाजीपाला पुरवला जातोय त्यांच्या कडून ऑनलाइन पेमेंट घेतले जाते. तसेच शेतक-यांनाही त्यांच्या मालाचे आँनलाईन बील दिले जाते. भाजीपाल्या बरोबरच शहरी भागात आत्ता फळांची ही मागणी होत असून फळे कंपनीद्वारे पुरविली जाणार आहे. येत्या आठवड्याभरात कंपनीद्वारा एक अॅप डेव्हलप केले जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.