पुणे- पुणे महापालिकेची 33 उद्याने गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहेत, असे आदेश मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्यानात आता व्यायाम, धावणे, चालणे यावर बंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही उद्याने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सुरुवातीपासूनच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला होता. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना उद्याने सुरू ठेवणे बरोबर नाही, अशी भूमिका महापौरांनी मांडली होती.
शहरातील उद्याने सुरू झाल्याने उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. बाके, ओपन जिममधील व्यायाम साहित्याच्या वापरामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. उद्याने सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून सामाजिक अंतर न ठेवणे, मास्क न घालणे, पुणे महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या सोबत गैरवर्तवणूक करणे, असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेची ही 33 उद्याने बंद करण्याचे आदेश अशोक घोरपडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी म्हपालिकेचे अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. उद्याने सुरू असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ होण्याची भीती होती. त्यामुळे ही 33 उद्याने बंद होणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले. कंटेन्मेंट झोन वगळता सुरू करण्यात आलेले उद्याने आत्ता गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर यांनी घेतला आहे. त्यामुळे सुरू करण्यात आलेले उद्याने आता पुन्हा बंद होणार आहेत.