पुणे - महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. सोनकांबळे हे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्यावतीने उपाययोजनाही केल्या जात आहे. यादरम्यान पालिकेत काम करणारे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर काहींचा मृत्यूदेखील झाला. त्यात आता ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणारे दयानंद सोनकांबळे यांचेही कोरोनाने निधन झाले. सोनकांबळे यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ताडीवाला रोड येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल
अनेक लोकोपयोगी कामे केली -
ताडीवाला रोड परिसरात राहून सोनकांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले होते. पुणे महापालिकेत नोकरी करीत असताना ते महापालिका सहायक आयुक्त पदापर्यंत पोहोचले होते. त्यांनी कर आकारणी व कर संकलन विभागात, महापालिका आयुक्त कार्यालय व अन्य कार्यालयामध्ये काम केले होते. ते मनमिळाऊ व शांत स्वभावाचे व चांगले काम करणारे अधिकारी म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्गात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती.