पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे शेतातील विहीरीच्या रिंगचे बांधकाम करताना रिंग पडून मुरूम ढासळला. या दुर्घटनेत चार मजुर अडकल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. या अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
कामगारांचा शोध सुरू : याबाबत थोडक्यात माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या हद्दीत कवडे वस्तीलगत जमीन गट नंबर 338 मध्ये असलेल्या विहिरीच्या रिंगचे बांधकाम सुरु होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. कालपासून अधिकारी वर्ग देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर कामगारांचा शोध सुरू आहे. सुरक्षेच्या उपापयोजना नसल्यामुळे या प्रकारच्या घटना घडत आहेत. मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची घटना : मागील महिन्यात इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण त्याखाली गाडले गेल्याची घटना घडली होती. पावसाळ्यात दरड कोसळल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे देखील पाहावयास मिळते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. इर्शाळवाडीत बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या चार तुकड्या दाखल झाल्या होत्या. या शोधमोहिमेत 27 मृतदेह सापडले होते, तर 57 जण बेपत्ता होते.
भूस्खलनाची घटना : मृतांमध्ये 12 पुरुष, 10 महिला आणि 4 लहान बालकांचा समावेश होता. 19 जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही भूस्खलनाची घटना घडली होती. सलग चार दिवस हे रेस्क्यु ऑपरेशन सुरू होते. भूस्खलनात गावातील 48 पैकी 17 घरे पूर्ण किंवा अंशत: गाडली गेली होती. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे या घटनेत अनाथ झालेल्या 2 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची काळजी घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
हेही वाचा :