पुणे: अर्थसंकल्पात विविध घटक तसेच देव देवस्थानसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात विविध आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव रक्कम काढली आहे. अश्यातच ब्राह्मण समाजासाठी यंदाच्या या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसून राज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे. असा आरोप यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.
आमच्या मागणीकडे दुर्लक्ष: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्पात धनगर समाजाला 35,000 कोटी, भिडे स्मारकाला 50 कोटी, लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळला 50 कोटी, गुरव समाजासाठी काशीबा गुरव विकास महामंडळला 50 कोटी, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ असून यासाठी 50 कोटी, वडार समाजासाठी मारुती चव्हाण महामंडळ असून त्यांच्यासाठी 50 कोटी अशी तरतूद केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाकडून मागणी करण्यात येत आहे की, परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. कसबा मतदार संघात ब्राह्मण समाजाने जी भाजपला साथ दिली नाही, त्याचा राग अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला असल्याचे मत यावेळी दवे यांनी सांगितले.
सामाजिक विघटिकरण: ब्राह्मण समाजासाठी परशुराम विकास महामंडळ स्थापन कराव अशी मागणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून करत आहोत. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. पण नेहेमी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काय तर म्हणे अमृत योजना देण्यात आली आहे. पण ती सर्वच खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यात सगळेच दावा सांगणार आहे. ज्या समाजाला शासन करत असलेल्या सहकार्यला आमचा विरोध नाही. त्याचे स्वागतच आहे. पण हे सर्वच समाज या आधी सुद्धा कोणत्या ना कोणत्या विकास महामंडळात लाभार्थी होतेच की ?मग वेगळे परशुराम महामंडळ का नाही. मुळात असे सामाजिक विघटिकरण करण्यापेक्षा सर्वच जातींच्या गरजूसाठी एकच महामंडळ असावे या मताचे आम्ही आहोत.असे देखील यावेळी दवे यांनी सांगितले.