पुणे - दिवाळी आणि फटाके हे समीकरण ठरलेलंच.. मात्र, मागील काही वर्षांपासून हे समीकरण बदलले जात आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर अलीकडे नागरिकांचा भर असल्याचे दिसून येते. त्यात यंदा कोरोनामुळेही नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट आहे. त्यामुळे याचाच फटका यंदा फटाका विक्रीला बसला आहे. पुणेकरांनी फटाका खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्यामुळे विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत.
फटाक्यांचा बाजारात दरवर्षी चायनीज फटाकेही उपलब्ध असतात. परंतु, यंदा पुण्यातील फटाक्यांच्या बाजारपेठेत कुठेही चायनीज फटाके दिसत नाहीत. चायनीज फटाके स्वस्त असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी असते. त्याची गुणवत्ता चांगली नसली तरी स्वस्त असल्यामुळे नागरिक हे फटाके खरेदी करतात. पण यावर्षी आम्ही चायनीज फटाके मागवले नाहीत, असे कैलास सोनवणे यांनी सांगितले.
लहान मुलांमध्ये अजूनही फटाक्यांचे आकर्षण
फटाके विकत घेण्यासाठी आलेली एक ग्राहक महिला म्हणाली, प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके फोडू नये, असे प्रबोधन वारंवार करण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण झाली. परंतु, लहान मुलांमध्ये फटाक्यांविषयीचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडेफार फटाके घ्यावेच लागतात. मुलांच्या हट्टाखातर थोडेफार फटाके आम्ही खरेदी केले. त्यामुळे आजही मी आवाज न करणारे, धूर न करणारे आणि प्रदूषण न करणारे काही फटाके विकत घेतले आहेत.
ग्राहकांनी पाठ फिरवल्याचा फटका मात्र फटाके विक्रेत्यांना बसला आहे. विक्रीसाठी आणलेल्या फटाक्यांचे पुढे काय करायचे? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. दिवाळीच्या दिवसात विकले न केलेले फटाके पुढे कुठे ठेवायचे? असा प्रश्न विक्रेत्यांना पडतो. त्यामुळे कमी दरात का होईना हे फटाके विकून टाकण्याकडे त्यांचा कल असतो.