पुणे - राज्य सरकारने परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीवर 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात अद्यापही शेतीचे पंचनामे होत नसल्याने कोट्याधी रुपयांच्या मदतीच्या घोषणेचे करायचे काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांसह कांदा, बटाटा, सोयाबीन, ऊस, भाजीपाला अशा पिकांसह जनावरांच्या खाद्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर काही भागात अजून ही उभ्या पिकांमध्ये पाणी थांबलेले आहे. शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. मात्र शासकीय पातळीवरुन अद्यापही पंचनाम्यांना सुरूवात झालेली नसल्याने मदत कशी मिळणार म्हणून शेतकरी चिंतेत आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 49 हजार 558 शेतक-यांचे 18 हजार 746.18 हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
दहा हजार कोटींचे पॅकेज..
राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये, मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीक नुकसानीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये, रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी, नगर विकाससाठी ३०० कोटी, महावितरण उर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागासाठी १०२ कोटी रुपये, कृषी, शेती, घरांसाठी ५ हजार ५०० कोटी रुपये असे एकूण ९ हजार ७७६ कोटी रुपयांचे हे मदत पॅकेज आहे.