पुणे - ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील लसीकरणासाठी केवळ 4 हजार नवीन कोविशील्ड लसीचे डोस मिळाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, लसीचा हा साठा अत्यंत कमी आहे.
लसीचा साठा अपुरा असल्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाला निवेदन देऊन, लसींचा साठा समप्रमाणात व्हावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी सांगितले. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. तर आज देखील अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. अनेक नागरिक हे कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अद्याप त्यांना लस मिळालेली नाही.
तालुकानिहाय लसींचे वितरण
आंबेगाव - 250, बारामती - 250, भोर - 150, दौंड - 250, हवेली - 300, इंदापूर - 250, जुन्नर - 250, खेड - 300, मावळ - 250, मुळशी - 250, पुरंदर - 200, शिरूर - 250, औंध जिल्हा रूग्णालय - 400, पुणे कॅन्टोन्मेंट - 100, खडकी कॅन्टोन्मेंट - 100
हेही वाचा - हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, गवाकऱ्यांची फ्री स्टाइल हाणामारी