पुणे - विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांनी कोरोनापासून संरक्षण आणि उपाय करणाऱ्या विविध गोष्टी प्रत्यक्षात आणल्या. खडकवासला येथील संरक्षण विभागाच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी(डीआयएटी) या संस्थेनेदेखील यात योगदान दिले आहे. त्यांनी छातीच्या एक्सरेतून कोरोना आहे की नाही याची विनाशुल्क माहिती देणारे तंत्र विकसित केले आहे.
कोरोना आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी स्वॅब टेस्ट घेतली जाते. त्यानंतर कोरोनाचे निदान होते. शासकीय संस्थामध्येही चाचणी मोफत केली जाते तर खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी तीन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. कोरोनाचा विषाणू हा नाकावाटे शरीरात जातो आणि त्यानंतर तो शरीरात मारा करण्यास सुरुवात करतो. स्बॅव टेस्टसोबतच आता रुग्णांना छातीच्या एक्सरेतूनही कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे पाहता येणार आहे. डीआयएटीच्या संशोधक सुनिता ढवळे यांनी हे तंत्र विकसित केले असून पुण्यासह दिल्लीतील डीआरडीओच्या वल्लभभाई पटेल रुग्णालयात या तंत्रज्ञानाची चाचणीही करण्यात आली आहे.
रुग्णांनी आपला एक्सरे काढल्यानंतर diat.ac.in या वेबसाईटला जावे. तेथे लाल रंगात मुख्य पेजवर एनेबल कोवीड 19 या ऑप्शनला जाऊन आपला एक्सरे अपलोड करायचा आहे. साधारपणे काही सेकंदात सदर रुग्णाला कोरोना आहे का की नाही, याची माहिती मिळते. तसेच काही संशयांस्पद लक्षणे आढळल्यास तशी सूचनाही रुग्णाला दिली जाते. यासाठी डीआयएटी कोणतेही शुल्क आकारत नाही.