पुणे - माझे पहिले गुरू आई-वडील आहे. ते दोघेही शिक्षकी पेशातील आहे. माझी जडणघडणीमध्ये सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळे गुरू भेटत गेले. त्यांनी प्रत्येक संकटांना कसे सामोरे जायचे? हे मला माझ्या गुरुंनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूर, सांगली महापूर, नांदेडच्या गोदावरीला आलेला पूर यासोबतच आता आलेले कोरोनाचे संकट, या सर्व संकटांना सक्षमपणे सामोरे गेलो. ते फक्त माझ्या गुरूंमुळे शक्य होऊ शकले, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
कोणत्याही गोष्टीचा मुळापासून अभ्यास करायचा, हे मला माझ्या गुरुंनी शिकवले. त्यामुळे मी प्रत्येक आलेल्या संकटांचा मुळापासून अभ्यास करतो. मग तो सांगलीचा महापूर असेल, की कोरोना. महापुराची कारणे काय? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मी करत असतो. हा गुण मला फक्त माझ्या गुरूंकडून मिळाला. त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या संकटांना मी सामोरे जाऊ शकलो. पाच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळताना देखील मला माझ्या गुरूंनी ज्या काही गोष्टी शिकवल्या त्याचा फायदा झाला असल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्व गुरुंना वंदन केले.