पुणे- येत्या शनिवारपासून पुणे शहर हे दहा दिवसांसाठी लष्कराच्या माध्यमातून संपूर्णपणे लॉकडाऊन केले जाणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे कुठलेही पाऊल उचलले जाणार नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
गेल्या एक-दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये पुणे शहर हे येत्या शनिवारपासून संपूर्णपणे दहा दिवस लष्कराच्या माध्यमातून लॉकडाऊन केले जाणार असल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात आले होते.
नागरिकांनी या दहा दिवसांचा जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून ठेवावा, भाजीपाला, धान्य सामान हे भरुन ठेवावे, असे या मेसेजच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे. मात्र या मेसेजमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.