पुणे - कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये निराधार, दिव्यांग तसेच वयोवृद्धांना शरद भोजन योजनेच्या माध्यमातून दोनवेळच्या जेवण्याची सुविधा पुरवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु असलेल्या या उपक्रमानंतर आता समाजकल्याणच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगाना तांदुळ, पीठ, डाळ, असे १५ किलो धान्य पुरवले जात आहे. १ हजाराप्रमाणे ४ महिन्यांचा निर्वाह भत्ता देखील त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली आहे.
खेड तालुक्यातील पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटात दिव्यांगांना धान्य वाटपास सुरुवात झाली आहे. यामार्फत ९८ दिव्यांग नागरिकांना ५ किलो तांदूळ, ५ किलो आटा, आणि ५ किलो हरभरा डाळ, असे १५ किलो धान्य मोफत वितरित करण्यात आले आहे. तसेच मार्च, एप्रिल आणि मे आणि जून या ४ महिन्याचा प्रतिमहा १ हजार याप्रमाणे ४ हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देखील बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात एकही नागरिक उपाशी पोटी झोपणार नाही, यासाठी प्रशासनाचा प्रत्येक विभाग मोठ्या मेहनतीने काम करत आहे. कोरोनाच्या महामारीवर मात करण्याची मोहिम आखली जात असून या मोहिमेतून जिल्हा परिषद यशस्वी वाटचाल करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी सांगितले.