पुणे - पुणेकरांना आज झिरो शाडो-डे अनुभवायला मिळाला. दुपारी बरोबर १२ वाजून २१ मिनिटांनी पुणेकरांची सावली त्यांच्यापासून नाहीशी झाली होती. सूर्य आणि पृथ्वीवरील भाग हा अक्षांशावर एक झाल्यावर त्याला झिरो शाडो असे म्हणतात.
सूर्याचे वर्षभरात उत्तरायण आणि दक्षिणायन मार्गक्रमण सुरू असते. सूर्य ज्या वेळी दक्षिणेकडे जात असतो त्यावेळेस त्याला दक्षिणायन म्हणतात. तर दक्षिणायन सुरू असताना आपल्याला हिवाळा ऋतू अनुभवायला मिळतो. सूर्याच्या मार्गक्रमणावर ऋतुचक्र अवलंबून असते. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. २३ मार्चला सूर्य हा विषवृत्तावर आला होता. सूर्य विषवृत्ताकडून उत्तरेकडे मार्गक्रमण करतेवेळी त्याच्या अक्षांशावर येणाऱ्या शहरांमध्ये हा झिरो शाडो-डे अनुभव येत असतो.
आज पुण्यात झिरो शाडो-डे अनुभवायला मिळाला. पुण्यातल्या टिळक स्मारक येथे ज्योतिर्विद्या संस्थेच्या माध्यमातून या खगोलीय घटनेचा अभ्यास केला गेला. याठिकाणी वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून झिरो शाडो-डेचा अनुभव सर्वांना देण्यात आला. हा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने खगोलप्रेमी पुणेकर उपस्थित होते. सोबतच टेलिस्कोपच्या माध्यमातून सूर्य बघण्याची संधीही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या ग्रुपच्या माध्यमातून लहान, थोरांनी सूर्य निरीक्षण केल्याचे खगोल अभ्यासक सागर गोखले यांनी सांगितले.