पुणे Pune By Election : पुणे लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेसची असून यासाठी काँग्रेसमधून माजी आमदार मोहन जोशी, तसंच कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील उत्सुक आहेत. पुण्याची जागा जरी पारंपरिक असली तरी आता महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. पुण्याच्या या जागेवर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) तसंच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे देखील दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप तर शिवसेनेत देखील अनेक पदाधिकारी इच्छूक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं आता पुण्याच्या या जागेवरून आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जर सांगितलं तर मी देखील ही निवडणूक लढवणार - दीपक मानकर , शहराध्यक्ष, अजित पवार गट
तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील पुण्याच्या या जागेच्या संदर्भात तिन्ही पक्ष दावे करत आहेत. पुण्याच्या जागेवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवली जाते. पण आता महायुतीत भाजपा, सेना आणि राष्ट्रवादी असल्यानं हे तिन्ही पक्ष या जागेवर दावा करत आहेत. भाजपाकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, तसंच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांच्यासह अनेक जण इच्छूक असल्याचं सांगितलं जातंय. तशा पद्धतीनं बॅनरबाजी देखील केली जात आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील पुण्याच्या या जागेवर इच्छूक असल्याचं सांगितलं जात आहे.
ही जागा पारंपरिक काँग्रेसची असून येथे काँग्रेसचाच उमेदवार उभा राहणार आहे. इतकच नाही तर तो जिंकणार देखील आहे. आता जरी दावे प्रतिदावे होत असले तरी याबाबत तिन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी बसून निर्णय घेणार आहेत आणि ही जागा काँग्रेसच लढवणार - मोहन जोशी, माजी आमदार, काँग्रेस
महायुतीत बिघाडी : एकीकडं विरोधकांकडून देशातील विरोधकांना एकत्र आणत इंडिया आघाडी तयार करण्यात आलीय. तर दुसरीकडे भाजपा देखील महायुतीमधील छोट्या पक्षांना एकत्र आणत यंदा 400 पार चा नारा देत आहे. असं असलं तरी पुण्याच्या लोकसभेच्या जागेसंदर्भात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत बिघाडी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -