पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आले. या काळात सर्व व्यवसाय आणि व्यवहार ठप्प असल्याने अनेकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हातावरती पोट असणाऱ्या बारा बलूतेदारांची संख्या यात जास्त आहे. मात्र, त्यांना राज्य सरकार कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नसल्याचा आरोप भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. बारा-बलुतेदारांसाठी पुण्यातील कसबा पेठेत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या महासंकटात भाजपने अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली आहे. केंद्र सरकारनेही राज्य सरकारला आवश्यक तो निधी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हातावर पोट असणाऱ्या बारा बलुतेदारांना दहा हजार रुपये प्रति महिना मदत करावी. ही विनंती करण्यासाठी लोकशाही मार्गाने भाजप आंदोलन करत आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.
सध्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याच्या मुळाशी पैसा हे कारण आहे. लोकांना उत्पन्नच नाही त्यामुळे ते आत्महत्यांचा मार्ग अवलंबत आहेत. सरकारने अशा लोकांना मदत करावी, असे खासदार बापट म्हणाले. 'आघाडी सरकार सोता है, बारा बलुतेदार रोता है, आघाडी सरकार हाय-हाय, अशा घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या.