राजगुरुनगर (पुणे) : भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आजपासून (शुक्रवार) प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हे काम सुरू करण्याला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे, तर दुसरीकडे गावपातळीवर जाऊन प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्यासाठी महसूल विभागाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
भामा आसखेड धरणातुन पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. किरकोळ अपवाद वगळता या जलवाहिनीचे एक किलोमीटरचे काम आसखेड खुर्द गावच्या परिसरात सर्वानुमते बाकी ठेवण्यात आले होते. परंतु, कालपासून अचानक प्रशासनाने सर्व सुत्रे हलवून हे काम सुरू करण्यासाठी हालचाली केल्या आणि त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असल्याने काम बाकी ठेवायचे, असे ठरले असताना देखील पोलीस बळाचा वापर करून शासन जी दडपशाही करत आहे, त्याचा प्रकल्पग्रस्तांनी निषेध केला आहे.
प्रशासनाकडून गावपातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचे काम सुरू…
भामा आसखेड परिसरात एक पोलीस निरीक्षक, १६ अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाचे १०० कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७५ कर्मचारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे आर्थिक स्वरूपात मोबदला देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पाईट, शिवे, अहिरे, पाळू, आंबोली, वहागाव आणि करंजविहिरे या सजाच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत पथक तयार करून गावपातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
परंतु आम्हाला जर आर्थिक मोबदला घ्यायचा असता तर आम्ही तीस वर्षे न्यायालयात आणि रस्त्यावर लढा कशाला दिला असता? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहे.