पुणे - लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात 14 दिवस बंद राहणार आहे. 14 दिवसांच्या या कालावधीत धावपट्टीवरील रिसरफेन्सिंगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या 14 दिवसांमध्ये विमानतळावरील सेवा बंद राहणार आहे. पुणे विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची माहिती दिली आहे. 26 एप्रिल ते 9 मे या कालावधीत धावपट्टीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे तिकिट बुकिंग करताना प्रवाशांनी विमानतळ बंद असलेल्या तारखा लक्षात घ्याव्यात, असे आवाहन विमानतळ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत उड्डाणे बंद -
लोहगाव विमानतळ हे संरक्षण खात्याच्या मालकीच्या जागेवर आहे. त्यामुळे प्रामुख्याने हवाई दलाच्या विमानासाठी या विमानतळाचा वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या विमानतळावरून सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरू आहे. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत या विमानतळावरील उड्डाणे बंद आहेत.
काम एक वर्ष चालणार -
26 ऑक्टोबर 2020 पासून लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे एक वर्ष हे काम चालणार असल्याचे लोहगाव विमानतळ प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कामासाठी 26 एप्रिल ते 9 मे दरम्यान हे विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बंद असणाऱ्या तारखा लक्षात घेऊनच तिकिट बुकिंगचे नियोजन करावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू करण्याचा दोन दिवसात निर्णय - उदय सामंत